Chandrapur News: तरुण रक्ताला मिळालं लोकशाहीचं व्यासपीठ

Bhairav Diwase
'विकसित भारत युथ पार्लमेंट' उत्साहात संपन्न
चंद्रपूर:- चंद्रपूरच्या तरुण रक्ताला आता लोकशाहीचे एक मोठे व्यासपीठ मिळाले आहे. केंद्र सरकारचे 'युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय', 'मेरा युवा भारत' आणि चंद्रपूरचे 'सरदार पटेल महाविद्यालय' यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 'विकसित भारत युथ पार्लमेंट'चे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात सकाळी ११ वाजता उत्साही वातावरणात या पार्लमेंटचा श्रीगणेशा झाला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत १८ ते २५ वयोगटातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यंदाचा विषय होता— "आणीबाणीचे ५० वर्ष: भारतीय लोकशाहीचे धडे."

केवळ भाषणबाजी न करता, लोकशाही मूल्यांची जोपासना आणि जबाबदार नागरिकत्व घडवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूरचे युवा नेतृत्व या व्यासपीठावर तावून-सुलाखून निघाले. सायंकाळी ४ वाजता या कार्यक्रमाचा समारोप झाला.


या सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, प्रमुख अतिथी चंद्रपूर शहर महानगरपालिका चे माजी महापौर अंजलीताई घोटेकर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे, चंद्रपूरचे सेवानिवृत्त उपपोलीस अधीक्षक राजेंद्रसिंह गौतम, चंद्रपूर सैनिक असिस्टंट मास्टर मनोदीप ठाकूर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रमोद शंभरकर, राष्ट्रीय सहयोजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर कुलदीप आर. गोड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. वंदना खनके, डॉ. राजकुमार बिरादार, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्रामुख्याने उपस्थित होते. या स्पर्धेतून पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात विक्राम हलदार, साहिल सोनवणे, वेदांत विधाते, हर्षल साळवे, विवेक धुर्वे हे पाचही विजयी विद्यार्थी आता मुंबईतील विधानभवनात होणाऱ्या 'राज्यस्तरीय युथ पार्लमेंट'मध्ये चंद्रपूरचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जिल्ह्याचा आवाज आता राज्याच्या सर्वोच्च सभागृहात घुमणार असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.