Chandrapur News: चंद्रपूर काँग्रेसमध्ये भूकंप! प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला गटनेत्यांकडून केराची टोपली

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षांतर्गत असलेला वाद आता थेट प्रदेश नेतृत्वाच्या विरोधात गेल्याचे पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः फोन करून दिलेल्या आदेशांना गटनेते राजेश अडूर यांनी केराची टोपली दाखवली असून, यामुळे पक्षात प्रचंड असंतोष पसरला आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या ७ जागांसाठी नुकत्याच निवडी पार पडल्या. या निवडीबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गटनेते राजेश अडूर यांना स्वतः भ्रमणध्वनीवरून स्पष्ट सूचना दिल्या होत्या. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करून शहर जिल्हाध्यक्षांमार्फत अधिकृत नावेही पाठवण्यात आली होती.
मात्र, पक्षशिस्तीचा जाहीर लिलाव करत राजेश अडूर यांनी प्रदेशाध्यक्षांच्या आदेशांना धाब्यावर बसवले. त्यांनी वरिष्ठ नेत्यांनी दिलेली नावे डावलून स्वतःच्या मर्जीतील नावे सादर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकारामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. "वरिष्ठ नेत्यांच्या शब्दाला पक्षात काही किंमत उरली आहे की नाही?" असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून, राजेश अडूर यांची गटनेते पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी प्रदेशाध्यक्षांकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.