चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील व्याघ्र पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात, असं आपण ऐकतो. मात्र, लोकप्रतिनिधींना हे नियम लागू होत नाहीत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार करण देवतळे यांनी ताडोबा प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवल्याचा प्रकार समोर आला आहे.
ताडोबाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात सफारी करताना मोबाईल नेणे हा नियमबाह्य आहे. वन्यजीवांच्या शांततेसाठी आणि सुरक्षेसाठी ताडोबा प्रशासनाने हा सक्त नियम केला आहे. एखादा सामान्य पर्यटक मोबाईलसह आढळल्यास त्याला थेट ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो. मात्र, आमदार करण देवतळे यांनी ताडोबाच्या निमढेला बफर गेटवरून सपत्नीक सफारी करताना चक्क मोबाईलचा वापर केला.
इतकेच नाही तर, त्यांनी या सफारीचे 'रिल' बनवून सोशल मीडियावर अपलोड केले. हे रिल बनवताना जिप्सीच्या आरशात मोबाईल स्पष्टपणे कैद झाला आहे. त्यामुळे त्यांनी नियमभंग केल्याचे पुरावे आता समोर आले आहेत.
आता प्रश्न असा निर्माण होतोय की, सामान्य पर्यटकांच्या बॅगांची तपासणी करून त्यांना शिस्त लावणारे ताडोबा प्रशासन या 'आमदार महोदयांवर' कारवाई करणार का? की लोकप्रतिनिधींसाठी नियमावली वेगळी आहे? ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या प्रकारानंतर आता वन विभाग काय पाऊल उचलतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.


