चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील दुर्गापुर पोलीस स्टेशन हद्दीतील तुकुम परिसरात १४ मार्च २०२६ ला रात्री एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, हा मृत्यू नसून गळा आवळून केलेली हत्या असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आपल्याच प्रेयसीचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून करणाऱ्या प्रियकराला दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे.
मृत प्रियंका वांढरे ही पतीपासून विभक्त राहून २२ वर्षीय अंकेश बहीरवार याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. अंकेश हा प्रियंकापेक्षा ७ वर्षांनी लहान होता. दोघात किरकोळ कारणावरून खटके उडत होते. अंकेशने १४ मार्च २०२६ च्या रात्री प्रियंकाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला.
हत्या केल्यानंतर अंकेशने हा आत्महत्येचा प्रकार वाटावा असा बनाव रचला. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला सर्वांना ही आत्महत्या वाटली. मात्र गुरुवारी प्रियंकाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला. अहवालात प्रियंकाचा मृत्यू श्वास गुदमरल्याने म्हणजेच गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. आयपीएस अधिकारी गौरव कायंदेपाटील आणि त्यांच्या पथकाने तात्काळ सूत्रे हलवली. संशयाची सुई अंकेशकडे होतीच, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.
पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला मोबाईल चार्जर आणि एक्स्टेंशन बोर्ड जप्त केला आहे. आरोपी अंकेश बहीरवार विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तो आता पोलिसांच्या कोठडीत आहे.


