Chandrapur News: मित्राचं लग्न, डीजेचा ठेका अन् "तो" नाचताना काळजाचा ठोका चुकला!

Bhairav Diwase

गोंडपिपरी:- लग्नाचा उत्साह... डीजेचा कडकडाट... आणि मित्रांसोबत थिरकणारी पावलं. पण कोणाला ठाऊक होतं की हाच आनंद शेवटचा ठरणार आहे? चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
फुर्डीहेटी गावातील अवघ्या २५ वर्षांच्या अल्पेश दहागावकर या तरुणाचा आपल्या मित्राच्या लग्नात नाचताना मृत्यू झाला आहे. संध्याकाळची वेळ होती, सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. अल्पेशही आपल्या मित्राच्या लग्नात मनापासून नाचत होता. मात्र, डीजेच्या तालावर डान्स करत असताना अचानक तो जमिनीवर कोसळला.


सुरुवातीला कोणालाच काही समजले नाही, पण जेव्हा अल्पेशने प्रतिसाद दिला नाही, तेव्हा उपस्थितांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला तातडीने गोंडपिपरीच्या सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला 'मृत' घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, अल्पेशचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिजेच्या आवाजाच्या प्रचंड तीव्रतेमुळेच हा झटका बसला असावा, अशी चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. तरुण रक्ताच्या मुलाचा असा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.