चंद्रपूर:- निराधार वृद्धांचा आधार बनलेल्या 'अपनापन' वृद्धाश्रमाच्या नावाचा वापर करून लाखो रुपयांची देणगी लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिनाभरापासून तक्रार करूनही पोलीस एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप वृद्धाश्रमाच्या संचालिका शाहिस्ता खान पठाण यांनी केला आहे.
भद्रावती येथील बंगाली कॅम्प परिसरात 'अपनापन' वृद्धाश्रम गेल्या चार वर्षांपासून निराधारांची सेवा करत आहे. मात्र, या सेवेच्या नावाखाली काही पांढरपेशा गुन्हेगारांनी लुटीचा बाजार मांडला आहे. मार्च २०२५ मध्ये चंद्रपूरच्या '३६०° करिअर इन्स्टिट्यूट'चा संचालक नितेश डोईफोडे याने मदतीचे आमिष दाखवून आश्रमाची माहिती मिळवली. मात्र, मदत करण्याऐवजी त्याने स्वतःच्या फायद्यासाठी आश्रमाचा पत्ता आणि फोटो वापरून जिल्ह्यातून लाखो रुपयांची देणगी गोळा करण्यास सुरुवात केली.
हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा ज्योती साठे आणि ज्योती ढवस नावाच्या महिलांनी आश्रमाला भेट दिली. नितेश डोईफोडे याने या महिलांना कामावर ठेवून दररोज हजारो रुपयांची देणगी गोळा केली. धक्कादायक म्हणजे, आश्रमाच्या नावाने पैसे घेऊन पावती मात्र दुसऱ्याच संस्थेची दिली जात होती. हा घोटाळा ३० लाख रुपयांच्या वर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संचालिका शाहिस्ता खान यांनी स्वतः माजरी कॉलनी आणि इतर भागात जाऊन चौकशी केली असता, ज्योती साठे आणि आरती हेवरकर या महिला आजही आश्रमाच्या नावाने परस्पर पैसे गोळा करत असल्याचे निष्पन्न झाले. पुराव्यांसह तक्रार देऊनही भद्रावती पोलिसांनी केवळ चौकशीचे आश्वासन देऊन टाळाटाळ केली. अखेर चंद्रपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी आदेश देऊनही अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही.
एकीकडे वृद्ध महिलांच्या सोयीसाठी धडपडणारी संस्था आणि दुसरीकडे त्यांच्याच नावावर स्वतःच्या तिजोऱ्या भरणारे हे रॅकेट. या प्रकरणात नेमका कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे? पोलीस प्रशासन या फसवणुकीच्या रॅकेटवर कधी कारवाई करणार? हा आता मोठा प्रश्न आहे.


