चंद्रपूर:- अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. तब्बल ६३ जनावरांसह ५८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखा शहरात पेट्रोलिंग करत असताना ही कारवाई करण्यात आली. मुळ रोडवरील एम.ई.एल. नाका येथे दोन संशयास्पद ट्रक आणि एक पायलट कार अडवण्यात आली. झाडाझडती घेतली असता, या ट्रकमध्ये अतिशय क्रूरपणे ६३ जनावरे भरल्याचे आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी ५८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एक पांढऱ्या रंगाची कार (पायलटिंगसाठी वापरली जाणारी), दोन मोठे ट्रक (क्रमांक MH 34 AV 0379 आणि TS 07 UG 3645), आरोपींचे ५ मोबाईल फोन आणि ६३ जनावरांचा समावेश आहे.
या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना घटनास्थळावरून अटक केली आहे. यामध्ये तेलंगणा, झारखंड, गुजरात आणि चंद्रपुरातील आरोपींचा समावेश आहे. याशिवाय आणखी ६ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रामनगर पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त केलेली सर्व ६३ जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टीने चंद्रपूर येथील 'प्यार फाउंडेशन' येथे जमा करण्यात आली आहेत.
आरोपींची नाव
१) शेख हाशेम शेख मोला, वय २७ वर्षे, व्यावसायिक,
2) मोसीन बेग मुबारक बेग, वय 29, दोघेही. रा. जयनूर, ता. जि. आसिफाबाद (तेलंगणा)
३) शेख अन्सारी अशरफ मिया, वय-३० वर्ष, धंदा-चालक, रा. मबडकीटांडा, ठाणा-बेगबाद, ता. जि. गिरडीह, (झारखंड),
४) समीर खान करीब खान, वय-१८ वर्ष, रा. गडचांदुर, जि. चंद्रपुर,
५) शेख जुनेद साबीर हुसेन, वय-१९ वर्ष, रा. संतोषनगर, बैरमपुरा, जि. अहमदाबाद (गुजरात)
६) इम्रान कुरेशी, ७) सादीक कुरेशी, ८) आवेश कुरेशी, तिन्ही रा. गडचांदुर, जि. चंद्रपुर
9) सोहल, रा. गोयगाव, ता. राजुरा, जि. चंद्रपूर
१०) वसीम कुरेशी, रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर
ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सध्या रामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


