चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध डॉ. मुंधडा हॉस्पिटलमध्ये झालेल्या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून चोरीची रक्कमही हस्तगत केली आहे.
चंद्रपूरच्या दीक्षित वॉर्डातील डॉ. मनीष मुंधडा यांच्या हॉस्पिटलमध्ये ४ एप्रिलच्या रात्री ही चोरीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्याने हॉस्पिटलच्या केबिनमध्ये प्रवेश करून लाकडी कपाटात ठेवलेले ६० हजार रुपये लंपास केले होते. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विनोद भुरले आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला.
या कारवाईत पोलिसांनी श्रीकांत उर्फ बोटतुट्या राजू चुनारकर (वय २३ वर्ष, राहणार आनंदनगर, चंद्रपूर) याला ताब्यात घेतले आहे. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरी केलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात सामील असलेला त्याचा साथीदार अतुल उर्फ मुजोर विकास राणा हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पकडलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी चंद्रपूर शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


