चंद्रपूर:- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांच्या 'घरवापसी'बाबत अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. जे कार्यकर्ते केवळ रागापोटी किंवा अन्याय झाल्यामुळे पक्षापासून लांब गेले होते, त्यांच्यासाठी पक्षाची दारे आता पुन्हा उघडली आहेत.
जे आपल्या कुळातील आहेत, आपल्या रक्ताचे आहेत, त्यांना बाहेर ठेवणे योग्य नाही," अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विशेषतः पालिका निवडणुकीत ज्यांनी स्वतंत्र लढत दिली, त्यांना पुन्हा सन्मानाने पक्षात घेण्यात आले आहेत. जर बाहेरच्या पक्षातील नेत्यांना आपण पक्षात घेऊ शकतो, तर ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी आयुष्य वेचले, अशा निष्ठावानांना का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्यांना अन्यायकारक वागणूक मिळाली, ज्यांचे ए.बी. फॉर्म नाकारले गेले, ते रागाने उभे राहिले असतील. पण ते भाजपचे निष्ठावान आहेत. कुटुंबातील सदस्यांना बाहेर ठेवून चालणार नाही. जेव्हा मला माहिती मिळाली, तेव्हा कोणालाही पक्षातून काढले नव्हते. मी घोषणा केली की त्यांना माहितीसाठी पक्षात प्रवेश देण्यात आला. जेव्हा की हा पक्षात प्रवेश नाही, तर ते आधीपासूनच पक्षात होते. ते थोड्या काळासाठी बाहेर गेले होते.
यावेळी मुनगंटीवारांनी पक्ष शिस्तीचा बडगाही उगारला. जे आमदार किंवा माजी मंत्री वारंवार सूचना देऊनही पक्षाच्या कामात अनुपस्थित राहत आहेत किंवा पक्षविरोधी कारवाया करत आहेत, त्यांच्यावर योग्य वेळी कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच ६ एप्रिल २०२७ रोजी 'चांदा ग्राऊंड' येथे होणाऱ्या भव्य स्थापना दिवसाच्या तयारीसह, येत्या वर्षात १०,००० सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले.
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीवर भाष्य करताना त्यांनी विरोधकांना टोला लगावला. "एखाद्या पक्षाने आत्मघात करायचे ठरवलेच असेल, तर जनता त्यांची इच्छा नक्की पूर्ण करेल," असे म्हणत त्यांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.


