चंद्रपूर:- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात शिवसेनेने आपली पकड अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या गोमती पाचभाई यांनी आज आपल्या शेकडो महिला समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना सचिव प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेच्या विस्तारासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. शिवसेना सचिव तथा पूर्व विदर्भ विभागीय संपर्क प्रमुख, प्रा. डॉ. मनीषाताई कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोमती पाचभाई यांनी अधिकृतपणे शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारले. केवळ गोमती पाचभाईच नव्हे, तर त्यांच्यासोबत चंद्रपूर शहरातील आणि ग्रामीण भागातील शेकडो महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.

