Murder News: विवाहितेचा गळा चिरून निघृण खून; तेलंगणातून आरोपी गजाआड!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धोपटाळा येथे एका ३५ वर्षीय विवाहितेचा अज्ञात इसमाने गळा चिरून निघृण खून केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ माजली होती. मात्र, चंद्रपूर पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्र फिरवत अवघ्या काही तासांतच थेट तेलंगणा राज्यातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

घटना आहे दिनांक २९ मे २०२६ रोजीची. फिर्यादी रणधीर राजू कुंभारे (रा. महाकाली कॉलनी, चंद्रपूर) यांना त्यांच्या सासूच्या शेजाऱ्यांनी फोनवरून माहिती दिली की, त्यांची पत्नी सौ. शितल कुंभारे हिने रक्ताच्या उलट्या केल्या असून तिची काहीही हालचाल होत नाहीये. रणधीर कुंभारे यांनी तात्काळ मोपेड वाहनाने धोपटाळा येथील सासूचे घर गाठले.


तेव्हा घरात जे दृश्य दिसले त्याने सर्वांचाच थरकाप उडाला. घराच्या पाठीमागील देव्हाऱ्याच्या खोलीत शितल कुंभारे या खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या. कोणातरी अज्ञाताने धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून खून केल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५१६/२०२६, कलम १०३ (१), ३३२ (२) बी.एन.एस. (BNS) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.


गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि राजुराचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांना तपासाचे आदेश दिले.
सायबर सेल आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढण्यात आला. एलसीबीचे पोउपनि विनोद भुरले आणि त्यांच्या विशेष पथकाने थेट तेलंगणा राज्यातील रापनपल्ली (ता. चेन्नूर, जि. मंचीरियाल) गाठले. तिथून संशयित आरोपी राजेश व्यंकटी अट्टेटेला (वय ३५ वर्षे) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजुराचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोउपनि विनोद भुरले, सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार आणि राजुरा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. लक्ष्मण लोकरे, पी.एस.आय. दीपक ठाकरे, पराग उल्लेवार, अतुल राठोड तसेच सायबर सेलच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी बजावली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी राजुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, खुनामागचे नेमके कारण काय होते याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.