टेंभुर्डा पेटले! देशी दारू दुकान स्थलांतराविरोधात ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा
चंद्रपूर:- ( राहुल थोरात ) वरोरा तालुक्यातील 30 ते 35 गावांच्या केंद्रस्थानी व नागपूर हायवेवर असलेल्या टेंमुर्डा गावात बंगाली कॅम्प, मूल रोड ,चंद्रपूर येथील देशी दारूचे दुकान स्थलांतरित करण्याच्या प्रशासनाच्या आदेशाविरोधात समस्त ग्रामस्थ एकवटून विरोधात उतरले आहेत. सदर प्रस्तावित दारूचे दुकान वस्तीमध्ये सुरू करण्याच्या हालचालीमुळे कायदा, सुव्यवस्था व गावातील तरुणाईवर अत्यंत घातक व वाईट परिणाम होण्याची भीती असल्याने टेमुरडा वासियांनी थेट जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले.
टेंभुर्डा ग्रामपंचायतीचे सदस्य मयूर राजू विरुटकर आणि सौ संगीता विजय तिखट सदस्या यांच्या नेतृत्वात १२५ ते १५० महिला व पुरुषांनी प्रशासनासमोर गावात "दारूचे दुकान नकोच "अशी आक्रमक व ठाम भूमिका मांडली.
दिनांक 27 मार्च 2026 रोजी आयुक्त ,राज्य उत्पादन शुल्क ,मुंबई यांचे आदेशानुसार बंगाली कॅम्प चंद्रपूर येथील देशी दारूचे दुकान टेंभुर्डा गावातील नागरी वस्तीत स्थलांतरित करण्याची परवानगी देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष बाब अशी की, शाळा, ग्रामीण रुग्णालय, तलाठी कार्यालय ,खाजगी दवाखाने ,मंदिर ,दर गुरुवारला भरनाऱ्या आठवडी बाजारपेठेत महिला व लहान मुलांची अतिशय मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने हा परिसर अत्यंत संवेदनशील असल्याचे ग्रामस्थ बोलत आहे .यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत तीन ते चार वेळा दारूबंदीचा ठराव घेऊन देशी दारू दुकान सुरू करण्याचा प्रयत्न धुडकावून लावण्यात आला आहे. परंतु पुन्हा एकदा प्रस्तावित देशी दारू दुकान चंद्रपूर वरून स्थलांतरित करून गावातील लोकांवर अन्याय केला जात आहे .या दारू दुकानासाठी आवश्यक असलेले ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र नसताना व समस्त ग्रामवासियांचा विरोध असतानाही राज्य उत्पादन शुल्क मुंबई विभागाचे आयुक्त कसा काय दुकान स्थलांतरित करण्याचा आदेश देऊ शकतात .असा संतप्त सवाल करण्यात येत आहे .
देशी दारूचे दुकान सुरू झाल्यास गावात भांडणे ,गोंधळ, महिलांना त्रास ,युवावर्ग व्यसनाधीनते कडे झुकण्याचा आणि सार्वजनिक सलोख्याचे वातावरण बिघडून शांतता धोक्यात येणे अपरिहार्य आहे असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने स्थळ पाहणी करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या मागणी बरोबरच गावातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार केला जावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान ,या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. गाव उध्वस्त करणारा देशी दारूच्या दुकानाचा स्थलांतरणाचा निर्णय प्रशासनाने तात्काळ मागे घेऊन गावाचे गावपण कायम राखावे .अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Social Plugin