Chandrapur News: पोटच्या दोन मुलांची विक्री करणाऱ्या आईसह तिघांना अटक, एक फरार


चंद्रपूर:- पैशांच्या हव्यासापोटी स्वतःच्या दोन निष्पाप मुलांची प्रत्येकी दोन लाखांत विक्री करणाऱ्या एका निर्दयी मातेचा थरारक कारनामा चंद्रपुरात उघडकीस आला आहे. स्वतःच्या मुलांची विक्री केल्यानंतर या महिलेने आपल्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा घाट घातला होता. रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा भयानक डाव उधळला गेला असून आंतरराज्य बाल तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आईसह, बाळ खरेदी करणाऱ्या चंद्रपूर आणि तेलंगणातील दोन महिलांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व नराधम प्रियकर अजय फुलझेले हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींवर 'मानवी तस्करी' आणि 'पॉक्सो' अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पतीच्या निधनानंतर आरोपी महिला अजय फुलझेलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दरम्यान, अजयने तिच्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, ज्यातून ती गरोदर राहिली. या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून आई आणि प्रियकराने मुलीला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात दाखल केले व तिचे वय २० वर्षे असल्याचे खोटे सांगितले. मात्र, डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. रामनगर पोलीसांनी तपास चक्र फिरवत मुलीच्या आईला ताब्यात घेतले. चौकशीत तिने यापूर्वी स्वतःची दोन मुले दोन-दोन लाखांत विकल्याची आणि आता मुलीच्या नवजात बाळाचाही सौदा करणार असल्याची धक्कादायक कबुली दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत बाळ खरेदी करणाऱ्या महिलांनाही अटक केली असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.