Murder News: माहेरी आलेल्या महिलेची झोपेतच गळा चिरून हत्या


राजुरा:- राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका ३६ वर्षीय विवाहित महिलेची झोपेतच गळा चिरून निघृण हत्या करण्यात आली आहे. शितल रणधीर कुंभारे असे या मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

मृत शितल कुंभारे या उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आपल्या माहेरी म्हणजेच धोपटाळा येथील टाऊनशिपमधील क्वॉर्टर क्रमांक ५२/२ येथे आल्या होत्या. घटनेच्या रात्री शितल यांची आई आणि भाऊ देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात शितल आणि त्यांची लहान मुलगी या दोघीच होत्या.

दोघीही रात्री झोपायला गेल्या असता, मुलगी दुसऱ्या खोलीत झोपली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला आणि झोपेत असलेल्या शितल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. आरोपीने शितल यांचा गळा चिरल्यामुळे त्यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू झाला.

सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घरात रक्ताने माखलेला शितल यांचा मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत आणि घरात घुसून झालेल्या या हत्येमुळे वसाहतीमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात सुरू असून, पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.