नागभीड:- नागभीड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भुकर मापक रंजित रामचंद्र कनोजकर आणि एका खाजगी इसमाला १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबी चंद्रपूरच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
तक्रारदाराच्या आजोबांच्या निधनानंतर, त्यांच्या घराची जागा वडिलांच्या नावाने फेरफार करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय नागभीड येथे अर्ज करण्यात आला होता. हे काम करून देण्यासाठी भुकर मापक रंजित कनोजकर याने सुरुवातीला १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ४ जून रोजी चंद्रपूर एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने पंचांसमक्ष पडताळणी केली असता, तडजोडीअंती १० हजार रुपये घेण्याचे निश्चित झाले. ५ जून रोजी एसीबीने नागभीडमध्ये सापळा रचला. तक्रारदाराने कनोजकर याला फोन केला असता, त्याने ही लाचेची रक्कम जयंत दीपक कामडी या खाजगी इसमाकडे देण्यास सांगितले. तळोधी येथील रहिवासी असलेल्या जयंत कामडीने जशी १० हजारांची लाच स्वीकारली, तसाच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. यानंतर मुख्य आरोपी भुकर मापक रंजित कनोजकर यालाही ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, श्रीमती माधुरी बावीस्कर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात श्री अनिल जिट्टावार, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार व सापळा पथक पोहवा रविकुमार इंगळे, पोशि अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदिप ताडाम, सचिन गजभिये, म.पो.शि. मेघा मोहुर्ले, चापोशि/सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व चापोशि/संदिप कौरासे, मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर
अनिल जिट्टावार पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर
९८२३२७०५८१
सचिन धर्मेजवार, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर
९६२३०५५६५५


