चंद्रपूर:-वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारा एक मोठा सायबर हल्ला चंद्रपुरात झाला आहे. येथील प्रसिद्ध 'कॅन्सर केअर फाउंडेशन हॉस्पिटल'च्या मुख्य सर्व्हरवर अज्ञात सायबर गुन्हेगारांनी रॅन्समवेअर हल्ला केलाय.
हॅकर्सनी केवळ हॉस्पिटलचा महत्त्वाचा डेटा लॉक केला नाही, तर तो अनलॉक करण्यासाठी तब्बल १.२३४५६ बिटकॉईनची म्हणजेच लाखों रुपयांची खंडणी मागितली आहे. जर ही खंडणी दिली नाही, तर कॅन्सरच्या शेकडो रुग्णांचा डेटा कायमचा नष्ट करण्याची धमकी हॅकर्सने दिली आहे. या सायबर हल्ल्यामुळे हॉस्पिटलचे काम पूर्णपणे कोलमडले आहे.
चंद्रपूर शहरातील कॅन्सर केअर फाउंडेशन म्हणजेच कॅन्सर हॉस्पिटलमध्ये १ जूनच्या सकाळी नेहमीप्रमाणे काम सुरू होणार होतं. मात्र, आयटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा मुख्य सर्व्हर सुरू केला, तेव्हा त्यांना सर्व्हरमध्ये मोठा बिघाड झाल्याचं आढळून आलं.
कॉम्प्युटर स्क्रीनवर तांत्रिक बिघाड नव्हता, तर थेट हॅकर्सचा धमकीचा संदेश चमकत होता! अज्ञात सायबर गुन्हेगारांनी रुग्णालयाची संपूर्ण 'हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम' (HIMS) आपल्या ताब्यात घेतली होती.
हॅकर्सनी रुग्णालयातील सर्व महत्त्वाच्या फाईल्स आणि डेटा एन्क्रिप्ट म्हणजेच लॉक करून टाकला आहे. हा डेटा परत मिळवण्यासाठी त्यांनी 'डिक्रीप्शन की' देण्याच्या बदल्यात १.२३४५६ बिटकॉईनच्या खंडणीची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास डेटा कायमचा डिलीट करू, अशी थेट धमकी या रॅन्समवेअर मेसेजमध्ये देण्यात आली आहे.
या डिजिटल दरोड्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर उपचार घेणाऱ्या शेकडो रुग्णांचा वैद्यकीय इतिहास (Medical History), त्यांच्या सुरू असलेल्या उपचारांची माहिती, आणि प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. डॉक्टरांना रुग्णांच्या जुन्या केस फाईल्स पाहण्यात प्रचंड अडचणी येत आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून हॉस्पिटल प्रशासनाने तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर सेलचे विशेष पथक या रॅन्समवेअर हल्ल्याचा तांत्रिक तपास करत आहे. मात्र, या घटनेने केवळ चंद्रपूरच नव्हे, तर राज्यातील सर्वच प्रमुख रुग्णालयांच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


