जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण.

Bhairav Diwase
एक वृक्ष, एक संकल्प; पत्रकार संघाने जोपासली पर्यावरणाची जाणीव.


राजुरा:- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, राजुरा शाखेच्या वतीने शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राजुरा पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय तसेच इतर ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली.
     महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे, डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे आणि जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.


    कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
      यावेळी जिल्हाध्यक्ष डिजिटल मीडिया चंद्रपूर ॲड. राहुल थोरात, तालुका अध्यक्ष प्रा. अनंत डोंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकरे साहेब, संघाचे सचिव अनिलकुमार गिरमिल्ला, डिजिटल मीडिया सचिव राकेश कलेगुरवार, उपाध्यक्ष सतीश शिंदे, संघटक कैलास कार्लेकर, प्रसिद्धी प्रमुख अनिल गांपावार, विजय जुलमे तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.