गोंडपिपरी:- खराळपेठ-गोंडपिपरी मार्गावरील कृषी संकुलाजवळ मंगळवारी रात्री एक अपघात झाला. रस्त्यावर अचानक आलेल्या डुकरांच्या कळपामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन उलटल्याने एका ३१ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सत्यजित मंडल हे आपले लहान भाऊ संपत मंडल यांच्यासह एपी २८ टी डी १९९६ क्रमांकाच्या वाहनाने मूल येथून कोंबड्या घेऊन तेलंगणाकडे जात होते. मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन वढोली जवळील कृषी संकुलापाशी पोहोचले असता, अचानक रस्त्यावर डुकरांचा कळप आडवा आला. डुकरांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालक सत्यजित यांनी अचानक ब्रेक लावला. मात्र, वाहनाचा वेग जास्त असल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावरच उलटले. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये सत्यजित मंडल यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा २३ वर्षीय लहान भाऊ संपत मंडल हा गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी संपत याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मृत सत्यजित मंडल हे तेलंगणातील कुमारभीम जिल्ह्यातील रवींद्रनगर येथील रहिवासी होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

