Food and Drug Administration: २ ठिकाणच्या धाडीत लाखांचा माल जप्त!

Bhairav Diwase
चंद्रपुरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
चंद्रपूर:- अन्न व औषध प्रशासनाच्या चंद्रपूर पथकाने जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेकरी आणि व्यापाऱ्यांवर प्रशासनाने हा मोठा हातोडा मारला आहे.


पहिली मोठी कारवाई चंद्रपूर शहरातील बायपास रोडवरील विजय नगर परिसरात करण्यात आली. या भागातील 'मे. न्यू फाईव्ह स्टार बेकरी'वर प्रशासनाने धाड टाकली. तपासणी दरम्यान या बेकरीमध्ये टोस्ट, रस्क यांसारख्या अन्नपदार्थांचे कोणतेही विनापरवानाआणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले. इतकेच नाही तर तयार उत्पादनांवर कुठलेही आवश्यक लेबल नव्हते आणि त्यांच्या दर्जामध्येही मोठ्या त्रुटी आढळल्या.

या कारवाईत प्रशासनाने ड्रायफ्रूट रस्क, चेरी टोस्ट आणि मैद्याचा साठा असा एकूण ३ लाख ६६ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून बेकरीला तात्काळ नोटीस बजावून उत्पादन बंद पाडले आहे. जप्त केलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

दुसरी कारवाई बल्लारपूर येथील रेल्वे चौकात असलेल्या 'मे. उमम प्रोव्हिजन'वर करण्यात आली. येथे अत्यंत अस्वच्छ वातावरणात 'चीज ॲनालॉग' हा संशयास्पद पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे संबंधित व्यापाऱ्याकडे या मालाच्या खरेदीची कुठलीही बिले उपलब्ध नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत ११ किलोचा हा संशयास्पद साठा जागेवरच नष्ट केला. या प्रकरणातील नमुनेही पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

सणासुदीच्या काळात किंवा इतर वेळीही तुम्ही जे अन्नपदार्थ खाताय ते सुरक्षित आहेत का, हा प्रश्न या कारवाईमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे विनापरवाना आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.