गोंडपिंपरी:- अहेरी-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील धानापूर फाट्याजवळ मंगळवारी दि.२ जुनला सकाळी १० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. रोशन वसंत लोहट (३४, रा. चारगाव, चेक ता. नागभीड) असे मृतकाचे नाव आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
चारगाव येथील रोशन लोहट हे करंजी येथील त्यांच्या सासुरवाडीला आले होते. मंगळवारी सकाळी ते त्यांचे मित्र चुडामणी माधव मडावी व खुशाल मडावी यांच्यासह दुचाकीने (एमएच-३४ एसी-३३२५) गोंडपिपरीकडे जात होते. दरम्यान, धानापूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या राम विजय मराठे (रा. गोंडपिपरी) यांच्या दुचाकीशी समोरासमार जोरदार धडक झाली. या धडकेत रोशन लोहट यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनात सुरजागडचे पेट्रोलिंग अधिकारी प्रदीप येल्लुरे, सहायक फौजदार देवाजी निखाडे, पोलीस कर्मचारी सचिन झाडे व प्रवीण कडुकर यांनी रुग्णवाहिका बोलवून जखमींना चंद्रपूरला हलविले.

