Bramhapuri News: बास्केटबॉल खेळून पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Bhairav Diwase

ब्रम्हपुरी:- खेळ संपल्यानंतर मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा डोहात बुडून मृत्यू झाला आहे. नैतिक अशोक शेंडे असे या मृत मुलाचे नाव असून, तो स्थानिक जानी वॉर्डातील रहिवासी होता आणि यंदा दहावीच्या वर्गात शिकत होता. या घटनेमुळे संपूर्ण ब्रह्मपुरी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी २ जून रोजी सकाळी नैतिक नेहमीप्रमाणे स्थानिक क्रीडा संकुलात बास्केटबॉल खेळण्यासाठी गेला होता. खेळ संपल्यानंतर त्याने आपल्या दोन मित्रांसह चांदगाव रोडवरील 'नाला डोंगे घाट' येथे पोहण्यासाठी जाण्याचा बेत आखला. मात्र, हाच बेत त्याच्या जिवावर बेतेल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.

घाटावर पोहोचल्यानंतर नैतिकने पाण्यात उडी घेतली, परंतु पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने तो तिथल्या खोल डोहात ओढला गेला आणि बुडू लागला. आपल्या मित्राला बुडताना पाहून सोबतच्या मुलांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून स्थानिक तरुणांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली. स्थानिक तरुणांच्या प्रयत्नांनंतर नैतिकला पाण्याबाहेर काढण्यात यश आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. खोल पाण्यात गुदमरल्यामुळे नैतिकचा श्वास आधीच थांबला होता.