Gadchandur News: गडचांदूर नगरपरिषदेत 'मनुष्यबळ निविदा' वाद

Bhairav Diwase
नगरसेविका शितल धोटे आक्रमक, नगराध्यक्षांकडे लेखी पत्राद्वारे हस्तक्षेपाची मागणी!
गडचांदूर:- नगरपरिषदेत मनुष्यबळ पुरवठा निविदा प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत, नगरसेविका शितल सुनील धोटे यांनी थेट नगराध्यक्षांकडे धाव घेतली आहे. 'ऑफलाईन निविदा रद्द न करताच ऑनलाईन निविदा का काढण्यात आली?' असा थेट सवाल करत धोटे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.


गडचांदूर नगरपरिषदेच्या कर विभागाने गेल्या १२ मार्च २०२६ रोजी मनुष्यबळ पुरवठ्यासाठी ऑफलाईन निविदा मागवल्या होत्या. मात्र, या निविदेवर कोणताही अंतिम निर्णय न घेता, अचानक १५ मे रोजी पुन्हा नवीन ऑनलाईन निविदा मागवण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे, जुन्या ऑफलाईन निविदा धारकांना याची कोणतीही पूर्वकल्पना किंवा सूचना देण्यात आलेली नाही.

नगरसेविका शितल धोटे यांनी नगराध्यक्षांना दिलेल्या पत्रात गंभीर इशारा दिला आहे की, जर जुने निविदा धारक या मनमानी कारभाराविरोधात न्यायालयात गेले, तर या प्रक्रियेवर स्थगिती येऊ शकते. परिणामी, शहराच्या विकासकामांना मोठा फटका बसू शकतो.

नगराध्यक्ष हे शहराचे प्रथम नागरिक आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या पत्राची एक प्रत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे.