२३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू!
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील सामधा येथे आज सकाळी एका ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या भीषण अपघातात अवघ्या २३ वर्षांच्या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धीरज भास्कर बोरकर, असं या मृत पावलेल्या युवकाचे नाव असून तो टेकरी येथील रहिवासी होता.
सामधा गावातील गुलाब नाथ यांच्या घराजवळ रेतीने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली रिकामी करण्याचे काम सुरू होते. यावेळी ट्रॉली रिकामी करण्यासाठी हुक काढत असताना, अचानक ट्रॅक्टर मागे सरकली. हा वेगाचा धक्का इतका भीषण होता की, धीरज काही समजण्याच्या आतच ट्रॉलीच्या मध्ये जोरदार दबला गेला. या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून धीरजचा मृतदेह सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे टेकरी गावासह संपूर्ण सिंदेवाही परिसरात शोककळा पसरली असून बोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

