पाणीटंचाईच्या प्रश्नावरून मनपा प्रशासनाचा निषेध
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरामध्ये वाढत्या भीषण पाणीटंचाईच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने “पाणी हक्क उठाव” आंदोलन करण्यात आले. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापासून ते महानगरपालिका बिल्डिंग गांधी चौकापर्यंत शेकडो महिलांची भव्य रॅली काढत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करण्यात आला.शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना अनेक दिवसांपासून तीव्र पाणी समस्येला सामोरे जावे लागत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.
चंद्रपूर शहरातील बाजार वॉर्ड, गंज वॉर्ड, बालाजी वॉर्ड, पठाणपुरा, बाबूपेठ, भानापेठ, हॉस्पिटल वॉर्ड, एकोरी वॉर्ड, महाकाली वॉर्ड, जलनगर वॉर्ड, बिनबा गेट वॉर्ड, रामनगर, दादमहल वॉर्ड, गौतम नगर, समाधी वॉर्ड, कोतवाली वॉर्ड, दादमहल परिसर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, अंचलेश्वर गेट परिसर, ताडबन परिसर तसेच भिवापूर परिसरांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे. शहरात ४६ ते ४७ अंश तापमान असताना महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत गरजांसाठीही पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
शहरातील अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटलेल्या अवस्थेत असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. अनेक वर्षांपासून अमृत जल योजनेचे काम सुरू असले तरी आजपर्यंत अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. दुसरीकडे नागरिकांकडून वाढीव पाणीकर आकारला जात आहे, दुप्पट पाण्याची बिले पाठवली जात आहेत, मात्र प्रत्यक्षात पाणीपुरवठा अत्यंत अपुरा आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत शिवसेनेच्या वतीने दिनांक १९ मे २०२६ रोजी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर २२ मे रोजी उपायुक्तांना टंचाईग्रस्त भागांची माहिती, टँकर आवश्यकता व सिंटेक्स बसविण्याबाबत सविस्तर यादी देण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नाही. अनेक भागांमध्ये टँकर पोहोचले नसल्यामुळे महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतरही प्रशासनाकडून केवळ टाळाटाळ होत असल्याने अखेर “पाणी हक्क उठाव” आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी प्रशासनाला अंतिम निवेदन देण्यात आले असून खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या :
१) शहरातील सर्व टंचाईग्रस्त भागांमध्ये तात्काळ नियमित टँकर व्यवस्था सुरू करण्यात यावी.
२) ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटलेल्या आहेत त्या तातडीने दुरुस्त करण्यात याव्यात.
३) रखडलेली अमृत जल योजना युद्धपातळीवर पूर्ण करून तत्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा.
४) प्रत्येक प्रभागात सिंटेक्स व पर्यायी पाणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी.
५) शहरातील १७ प्रभागांसाठी स्वतंत्र “जल कृती समिती” स्थापन करण्यात यावी.
६) प्रत्येक प्रभागामध्ये “जलमित्र” नियुक्त करण्यात यावेत, जे थेट नागरिक व महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय साधून पाणीपुरवठ्याचा नियमित पाठपुरावा करतील.
७) पाणीपुरवठा, टँकर व्यवस्था, पाईपलाईन दुरुस्ती व जलयोजनांच्या कामांचा दर आठ दिवसांनी आढावा घेण्यात यावा.
८) नागरिकांकडून आकारण्यात येणाऱ्या पाणीकराच्या तुलनेत योग्य प्रमाणात व नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा.
“शिवसेनेतर्फे विशेष जल कृती समिती स्थापन”
चंद्रपूर शहरातील पाणी प्रश्न हा केवळ आंदोलनापुरता मर्यादित न राहता वर्षभर सातत्याने पाठपुरावा व्हावा, नागरिकांच्या तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात तसेच प्रत्येक प्रभागातील पाणी समस्येवर नियमित देखरेख राहावी यासाठी शिवसेनेतर्फे विशेष “जल कृती समिती” स्थापन करण्यात आली आहे.
ही समिती शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून टंचाईग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेणार असून पाणीपुरवठा, टँकर व्यवस्था, पाईपलाईन गळती, अपुरा पाणीपुरवठा तसेच रखडलेल्या जल योजनांबाबत सातत्याने महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच प्रत्येक आठ दिवसांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनासमोर नागरिकांच्या समस्या मांडल्या जाणार आहेत.
प्रशासनाने या समितीशी सकारात्मक समन्वय ठेवून नागरिकांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार देखील व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनामध्ये जिल्हाप्रमुख ॲड. युवराज धानोरकर यांच्या मार्गदर्शनात, युवा सेना जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर यांच्या सहकार्याने गोमती पाचभाई यांच्या नेतृत्वात,रवी आसवानी, महेश पाटील, कार्तिक डोनिवार, कोमल मोहितकर, मेघा आक्केवार, ॲड. मृणालिनी रागीट, शुभांगी आसुटकर, संतोषी कादलवार, सीमा मेश्राम, कीर्ती कत्तुरवार, वनिता आसुटकर, वीरेन वाटकर,महेश आक्केवार यांच्यासह शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी “पाणी हा आमचा मूलभूत हक्क आहे”, “पाणी द्या अन्यथा आंदोलन तीव्र करू” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

