बल्लारपूर:- एका किरकोळ वादाचं रूपांतर थेट रक्तरंजित हल्ल्यात झाल्यामुळे कोठारी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केवळ एका युवतीशी बोलत असल्याच्या संशयावरून एका १९ वर्षीय तरुणावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पवन परशुराम डिवटे असं या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जूनच्या रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जखमी पवन याची गावातील एका युवतीशी मैत्री होती. मात्र, याच गोष्टीचा राग गणेश बाबुराव काशेट्टीवार याच्या मनात होता. यापूर्वीही गणेशने पवनला संबंधित युवतीशी न बोलण्याची धमकी दिली होती. सोमवारी रात्री पवन वांढरे बीअरबार परिसरात गेला असता, गणेश काशेट्टीवार त्याच्या दोन साथीदारांसह तिथे पोहोचला. तिथे त्यांच्यात जोरदार वाद आणि धक्काबुक्की झाली. त्यानंतर गणेश तिथून निघून गेला.
पण हा वाद इथेच संपला नाही. पवन जेव्हा आपल्या मोटारसायकलने घरी परतत होता, तेव्हा मारोती महाविद्यालयाजवळील कैकाडी माता मंदिर चौकात गणेश आणि त्याचे साथीदार दबा धरून बसले होते. पवनने गाडी थांबवताच गणेशने त्याची कॉलर पकडली आणि खिशातून चाकू काढून थेट त्याच्या हातावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी घबराट पसरली. हल्ल्यानंतर गणेश आपल्या साथीदारांसह घटनास्थळावरून फरार झाला आहे.
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून तरुणांमधील वाढती गुन्हेगारी आणि आक्रमकता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. याप्रकरणी कोठारी पोलिसांनी गणेश काशेट्टीवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११८(१) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ठाणेदार योगेश खरसान यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि देविदास वेलादी या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, फरार असलेल्या इतर दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

