चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा म्हणजे वाघांची भूमी, वाघांचं हक्काचं घर! पण सध्या याच घरात पर्यटकांनी घातलेला धुमाकूळ वन्यजीवांसाठी डोकेदुखी ठरतोय. कारवा वनक्षेत्रातून नुकताच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वाघ पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी पर्यटकांच्या वाहनांची अक्षरशः झुंबड उडाल्याचं दिसत आहे. महसूल मिळवण्याच्या नादात आपण वन्यजीवांचा शांततेचा अधिकार तर हिरावून घेत नाही ना? असा गंभीर प्रश्न या घटनेमुळे पुन्हा उपस्थित झालाय.
उन्हाच्या तीव्र काहिलीने अंगाचा दाह शमवण्यासाठी वाघीण आपल्या बछड्याला घेऊन करवा वनक्षेत्रातील एका पाणवठ्यावर आली होती. आई आणि बछड्याचे हे काही निवांत, खाजगी क्षण... पण पर्यटकांच्या हव्यासाने या क्षणांना सार्वजनिक करून टाकलं. एकामागून एक करत असंख्य वाहनांचा ताफा थेट पाणवठ्याभोवती येऊन धडकला. वाघाला अगदी जवळून कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटकांनी वाहनांचा वेढा तर घातलाच, शिवाय तिथे प्रचंड गोंधळही घातला.

