मुल:- मुल शहरात बेकायदेशीर अग्निशस्त्रांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि मुल पोलीस स्टेशनने संयुक्तरीत्या एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका आरोपीच्या घरातून अंदाजे २०,००० रुपये किमतीच्या दोन विनापरवाना गावठी बनावटीच्या भरमार बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
३ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे अधिकारी आणि कर्मचारी मुल शहरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, ताडाळा रोड, वॉर्ड नं. १७, मुल येथील रहिवासी संजुसिंग संतोषसिंग पटवा (वय २४ वर्ष) याने आपल्या राहत्या घरात विनापरवाना भरमार बंदुका लपवून ठेवल्या आहेत.
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि मुल पोलिसांच्या संयुक्त पथकाने पंचांसह संजुसिंग याच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता, पोलिसांना २० हजार रुपये किमतीच्या दोन गावठी बनावटीच्या भरमार बंदुका (अग्निशस्त्र) आढळून आल्या. पोलिसांनी या दोन्ही बंदुका पंचांसमक्ष जप्त केल्या आहेत.
विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे घरात घातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपी संजुसिंग संतोषसिंग पटवा याच्याविरुद्ध मुल पोलीस स्टेशन येथे भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुल पोलीस करत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, आणि मुलचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि मुलचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, विनोद भुरले, रूपेश कुंभरे, तसेच पोलीस अंमलदार धनराज करकाडे, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, सुमित बरडे, प्रफुल्ल गारघाटे, मिलिंद टेकाम, नरेश कोडापे, संदीप चुदरी आणि पुजा मेश्राम यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

