Chandrapur News: महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल अखेर 'मॅनेज'? नितेश कराळे मास्तरांचा थेट आरोप!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात लोकशाहीचा जाहीर लिलाव झाल्याचा खळबळजनक आरोप आता समोर आलाय. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, भाजपचे उमेदवार अरुण लखानी आता अविरोध विजयी झाले आहेत.


पण ही माघार साधीसुधी नाही! प्रसिद्ध विचारवंत आणि राजकीय विश्लेषक नितेश कराळे उर्फ कराळे मास्तर यांनी थेट काँग्रेस आणि मविआच्याच बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. "उमेदवार मॅनेज झाला असून नगरसेवकांच्या मतदानाचा अधिकारच गायब करण्यात आला आहे," असा थेट घणाघात कराळे मास्तरांनी केलाय.


लोकशाहीची थट्टा की पैशांचा खेळ? हाच प्रश्न आता विचारला जात आहे. काँग्रेसने मोठ्या विश्वासाने शैलेश अग्रवाल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपली उमेदवारी मागे घेतली. विशेष म्हणजे अर्ज मागे घेताना काँग्रेसचा एकही मोठा नेता त्यांच्यासोबत नव्हता.


याच मुद्द्यावरून आता नितेश कराळे यांनी मविआच्या अंतर्गत राजकारणावर आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवर आसूड ओढला आहे. कराळे मास्तरांच्या मते, हा लोकशाहीचा थेट खून आहे. नगरसेवक ज्यांना जनतेने निवडून दिले, त्यांच्या मतदानाचा अधिकारच पैशांच्या बळावर गायब करण्यात आला. विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांनी आपापसात 'मॅनेज' करून ही निवडणूकच निकालात काढली, असा आरोप आता केला जात आहे.