आजकाल सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲपचा खूप वापर करतात. खोट्या नोकऱ्या, गुंतवणूक योजना, सरकारी फायदे किंवा डिजिटल अटकेच्या नावाखाली लोकांना फिशिंग लिंक्स पाठवून फसवतात. अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सामान्य माणूस या संदेशांना ओळखू शकत नाही आणि अनेकजण फसतात. यामुळे व्हॉट्सॲप कंपनीने यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन 'स्कॅम अलर्ट' फीचर
व्हॉट्सॲप 'स्कॅम अलर्ट' नावाचे नवीन फीचर आणत आहे. अज्ञात नंबरवरून संशयास्पद संदेश आला की, लगेचच तुम्हाला चेतावणीचा अलर्ट दिसेल.
यात पाठवणाऱ्याला ब्लॉक करण्याचा किंवा रिपोर्ट करण्याचा सोपा पर्यायही मिळेल. जर संदेश सुरक्षित वाटला तर तुम्ही सहज चॅटिंग सुरू ठेवू शकता.
हे फीचर पूर्णपणे तुमच्या मोबाइलवरच काम करेल, कोणत्याही मेसेजचा डेटा सर्व्हरवर जाणार नाही. त्यामुळे एंड टू एंड एन्क्रिप्शन सुरक्षित राहील.
कसे वापराल?
हे फीचर ऐच्छिक असेल. म्हणजे डीफॉल्टनुसार बंद राहील. ज्यांना हवे असेल त्यांना ॲपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ते चालू करावे लागेल.
सध्या हे अँड्रॉइडसाठी तयार होत आहे. लवकरच बीटा टेस्टिंगसाठी उपलब्ध होईल आणि चाचण्या पूर्ण झाल्यावर सर्व वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने सुरू केले जाईल.
व्हॉट्सॲप प्लसची सशुल्क सेवा
याशिवाय व्हॉट्सॲप आणखी एक मोठी घोषणा करत आहे. कंपनी 'व्हॉट्सॲप प्लस' नावाची सशुल्क सबस्क्रिप्शन सेवा सुरू करत आहे. यात वापरकर्त्यांना अनेक अतिरिक्त फीचर्स आणि कस्टमायझेशन पर्याय मिळतील.
युरोपमध्ये याची किंमत सुमारे २८० रुपये इतकी आहे. भारतात अद्याप सुरू झालेली नाही, पण लवकरच भारतीय वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.
सुरक्षित आणि स्मार्ट व्हॉट्सॲप
व्हॉट्सॲप सतत नवीन फीचर्स आणत असते. स्कॅम अलर्ट फीचरमुळे लाखो वापरकर्ते फसवणुकीपासून सुरक्षित राहतील. हे फीचर येताच घोटाळेबाजांची धडकी भरेल. सध्या फीचर विकासाच्या टप्प्यात आहे, तरीही ही बातमी सर्वांसाठी दिलासादायक आहे.

