Chandrapur News: "आम्ही पोलीस आहोत..." सांगून चंद्रपुरात ८ तोळे सोन्याचे दागिने लंपास

Bhairav Diwase
चंद्रपूर:- दोन भामट्यांनी पोलिस असल्याची ओळख सांगून एका व्यक्तीची फसवणूक करत 8 तोडे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना चंद्रपूर शहरातील भानापेठ वॉर्ड परिसरात उघडकीस आली आहे. अजय अडगुडवार असे फसवणूक असलेल्या व्यक्तीचे नाव असून ते नेहमीप्रमाणे सकाळी गांधी चौक परिसरातील एका दूध डेअरीत दूध घेण्यासाठी गेले होते. 


दूध घेऊन परत येत असताना दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी त्यांना अडवले. "आम्ही पोलीस आहोत," असे सांगत त्यांनी बनावट ओळखपत्र दाखविले. यानंतर, सध्या अंगावर सोने घालण्यास मनाईचे आदेश आहेत. त्यामुळे अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काढून वाहनाच्या डिकीत ठेवा," असे त्यांनी अडगुडवार यांना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून अडगुडवार यांनी अंगावरील सोन्याचे दागिने काढून एका कागदात गुंडाळले आणि दुचाकीच्या डिकीत ठेवले. याच दरम्यान चोरट्यांनी चलाखीने दागिन्यांची पुडी बदलून त्यातील सोने लंपास केले आणि घटनास्थळावरून पसार झाले.

 काही अंतर गेल्यानंतर अडगुडवार यांना संशय आल्याने त्यांनी डिकी उघडून पाहिली. त्यावेळी सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि डिकीत केवळ रिकामी कागदाची पुडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अडगुडवार यांनी तत्काळ शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.