चंद्रपूर:- विदर्भातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. आज भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज दाखल केले. मात्र, या अर्ज सादरीकरणाच्या वेळी झालेल्या राजकीय घडामोडींनी आणि एका मोठ्या नेत्याच्या अनुपस्थितीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. भाजपकडून उद्योगपती आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण लखानी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर, पालकमंत्री डॉ. अशोक वुईके आणि स्थानिक आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर दुसरीकडे, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
मात्र, आजच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची अनुपस्थिती सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात होत असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी लावलेली दांडी राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण देऊन गेली आहे. या अनुपस्थितीमागे अंतर्गत नाराजी आहे की काही वेगळे कारण, याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी आणि नेत्यांनी विजयाचा प्रचंड आत्मविश्वास व्यक्त केला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांचा कौल आपल्याच बाजूने असल्याचा दावा केला आहे.

