Chandrapur police: गुटखा माफियांवर चंद्रपूर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; दोन टोळ्यांवर थेट 'मिनी मोक्का'!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- पोलिसांनी गुटखा आणि तंबाखू तस्करांच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर थेट 'मिनी मोक्का' म्हणजेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संघटित गुन्हेगारी कलमांतर्गत कारवाई केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध व्यापाराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. रामनगर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करत, आरोपी हे संघटित टोळी चालवून गुन्हे करत असल्याचे उघड केले. यात दोन मुख्य टोळ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) लावण्यात आले आहे.

पहिल्या कारवाईत घुटकाळा वॉर्डातील टोळी प्रमुख वसीम अक्तर झिमरी, सिद्धांत गोंडाणे आणि मो. अखिल शकील शेख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर दुसऱ्या कारवाईत बल्लारपूरचा टोळी प्रमुख जयसुखलाल अंबाराम ठक्कर आणि अजयकुमार गुंडोजवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तस्करांवर चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात आधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि एसडीपीओ प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात रामनगरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि त्यांच्या टीमने केली आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.