चंद्रपूर:- चंद्रपुरात स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य द्यावे आणि कामगारांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासह विविध १२ प्रमुख मागण्यांसाठी 'कोळसा खाण कंत्राटी स्थानिक कामगार संघर्ष मोर्चा'च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या बेरोजगार युवकांनी आज थेट भर रस्त्यात 'मुंडण' करून वेकोलि प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, वेकोलिअंतर्गत माती आणि कोळसा उत्खनन करणाऱ्या कंत्राटी कंपन्यांमध्ये स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त तरुणांना जाणूनबुजून डावलले जात आहे. याउलट बाहेरील राज्यातील कामगारांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जात आहे. अनेक कंपन्यांमध्ये स्थानिक कामगारांची संख्या नगण्य असल्याचा पुरावा देणाऱ्या कर्मचारी याद्याच आता आंदोलनकर्त्यांनी जाहीरपणे समोर आणल्या आहेत.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अनेकदा बैठका बोलावल्या. मात्र, वेकोलिचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या बैठकांना वारंवार अनुपस्थित राहत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनाच जर वेकोलि प्रशासन किंमत देत नसेल, तर आमच्यासारख्या सामान्य बेरोजगारांनी न्याय मागायचा कोणाकडे?" असा संतप्त सवाल यावेळी युवकांनी उपस्थित केला.
मागण्या पूर्ण होईपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही आणि आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा उपोषणकर्ते रोशन हरबडे यांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाला चंद्रपुरातील स्थानिक नागरिक आणि प्रकल्पग्रस्तांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने वेकोलि प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

