पोंभुर्णा:- पोंभूर्णा पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे एक मोठी कारवाई करत, गेल्या ६ वर्षांत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल १४ लाख ५८ हजार ५१० रुपये किमतीचा अवैध दारू साठा नष्ट केला आहे. विशेष म्हणजे, हा दारू साठा पोंभूर्णा पोलीस स्टेशन समोरील मुख्य सिमेंट रस्त्यावर रोड रोलर फिरवून नष्ट करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोंभूर्णा पोलीस स्टेशन अंतर्गत सन २०२० ते २०२६ या कालावधीत दारूबंदी कायद्यान्वये एकूण ८५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल, ज्यात ३९४ पेट्या व ११ किरकोळ देशी दारूच्या बाटल्या, तसेच ५ पेट्या व ६ किरकोळ विदेशी दारूचा समावेश होता, तो नष्ट करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त झाले होते.
आदेश मिळताच पोलिसांनी पारदर्शक पद्धतीने ही कारवाई पार पाडली. पोलीस स्टेशनसमोरील रस्त्यावर सर्व दारूच्या बाटल्या मांडून त्यावर थेट रोड रोलर फिरवण्यात आला. दारू नष्ट केल्यानंतर, काचांचा चुरा आणि रिकाम्या बाटल्यांमुळे कोणाला इजा होऊ नये, म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा सर्व कचरा एका मोठ्या खड्ड्यात गाडून नष्ट करण्यात आला.
सदर कारवाई पोंभूर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे, राज्य उत्पादन शुल्क राजुराचे दुय्यम निरीक्षक एस. टी. धीडसे, पोलीस कर्मचारी आणि अधिकृत पंचांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडली. या संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करण्यात आली असून, पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीमध्ये याची रीतसर नोंद करण्यात आली आहे.
ही धडक कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (मुल) सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात पोंभूर्णा पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


