Chandrapur Congress: चंद्रपूर मनपात काँग्रेसमध्ये भूकंप! वडेट्टीवार वि. धानोरकर संघर्ष पुन्हा पेटला!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता अत्यंत टोकाला पोहोचला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील गटबाजी आता थेट चव्हाट्यावर आली असून मनपातील गटनेता बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे.


चंद्रपूर मनपात काँग्रेसचे २७ नगरसेवक असून, खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवकांनी विद्यमान गटनेते राजेश अडूर यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. आज खासदार धानोरकर यांच्या निवासस्थानी तब्बल १६ नगरसेवकांची महत्त्वाची बैठक सुरू होती.


वडेट्टीवार समर्थक गटनेते राजेश अडूर यांनी १४ जून रोजी तातडीची बैठक घेऊन पक्षाचा 'व्हिप' जारी केला होता, तर धानोरकर गटाने १५ जून रोजी म्हणजेच आज विशेष बैठक बोलावली होती.

नगरसेवकांची कोंडी: दोन्ही बाजूंनी अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांवर थेट अपात्रतेची कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नगरसेवक 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशा कात्रीत सापडले आहेत.
४ महिन्यांतच संघर्ष उफाळला: काही महिन्यांपूर्वी दिल्ली दरबारी मिटलेला हा वाद केवळ चार महिन्यांत पुन्हा एकदा उफाळून आल्याने संपूर्ण शहराचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे.


काँग्रेसमधील या अंतर्गत 'लेटर बॉम्ब' आणि 'व्हिप वॉर' मुळे महापालिकेच्या राजकारणात मोठे पडसाद उमटणार हे निश्चित आहे. वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील हा वाद आता पक्षश्रेष्ठी कशा प्रकारे हाताळतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.