Section 36 applies : चंद्रपूर जिल्ह्यात मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कलम ३६ लागू!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी निर्गमित केले आहेत.

मोहरम उत्सव 17 जून ते 26 जून 2026 या कालावधीत साजरा होत असून दि. 25 व 26 जून रोजी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम व मिरवणुका आयोजित केल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी 24 जून 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून 26 जून रोजी रात्री 24 वाजेपर्यंत विशेष निर्देश लागू राहतील.


सदर आदेशान्वये पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना मिरवणुका व सभांमधील लोकांच्या वर्तनाबाबत निर्देश देणे, मिरवणुकांचे मार्ग व वेळ निश्चित करणे, धार्मिक स्थळांच्या परिसरात आवश्यक निर्बंध लागू करणे, सार्वजनिक ठिकाणी वाद्य, ढोल-ताशे व ध्वनिक्षेपकांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे तसेच सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.


तसेच सार्वजनिक सभा, मिरवणुका, वाद्य वाजविणे, ध्वनिक्षेपकांचा वापर तसेच घोषणाबाजी यासाठी संबंधित पोलीस ठाण्याची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी केले आहे.


मोहरम उत्सव शांततेत व सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.