Video Viral: "कर्जमाफी झालीच पाहिजे!"... थेट बैलावर स्वार होऊन शेतकरी पोहोचला तहसील कार्यालयात!

Bhairav Diwase
राजुरा:- "कर्जमाफी झालीच पाहिजे!"... या घोषणा तर तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण चंद्रपूरच्या राजुरामध्ये एका शेतकऱ्याने यासाठी जे केलं, ते पाहून सध्या संपूर्ण चंद्रपूर थक्क झालाय! राजुरा तालुक्यातील गोयेगावचे शेतकरी दिवाकर हिरामण पाहानपटे यांनी थेट बैलावर स्वारी करत राजुरा तहसील कार्यालय गाठलं. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला असून प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी दिवाकर यांनी हे पाऊल उचललं. "कर्जमाफी झालीच पाहिजे" अशा घोषणा देत जेव्हा ते बैलावर बसून आले, तेव्हा तहसील कार्यालयाबाहेर पाहणाऱ्यांची एकच गर्दी जमली होती.