Special Intensive Revision: चंद्रपूर जिल्ह्यात मतदार याद्यांच्या अचूकतेसाठी 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीम

Bhairav Diwase
३० जूनपासून 'बीएलओ' थेट तुमच्या दारी!
चंद्रपूर:- भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित करण्यासाठी 'विशेष सखोल पुनरीक्षण' (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) थेट नागरिकांच्या घरी जाऊन माहितीची पडताळणी करणार आहेत, अशी माहिती चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


या विशेष कार्यक्रमासाठी ०१ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, ज्या नागरिकांचे वय या तारखेला १८ वर्षे पूर्ण होत आहे, त्यांना आपली नाव नोंदणी करता येणार आहे.


जिल्ह्यात ८६.५६ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये 'Enumeration Forms' डाउनलोड करण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून कोणतीही तांत्रिक अडचण आलेली नाही. जिल्ह्यातील एकूण १७,९७,६५५ मतदारांपैकी १५,५६,०६४ मतदारांचे भौगोलिक/डिजिटल मॅपिंग पूर्ण झाले असून, हे प्रमाण ८६.५६ टक्के आहे. उर्वरित मतदारांचे मॅपिंग तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.


अचूक आणि अद्ययावत मतदार यादी हाच मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा मुख्य पाया आहे. नागरिकांनी घरात येणाऱ्या 'बीएलओ' अधिकाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा दुरुस्तीसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा.
वसुमना पंत, जिल्हाधिकारी, चंद्रपूर



विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे अधिकृत वेळापत्रक

1. प्रशिक्षण व पूर्वतयारी:- 20 जून 2026 ते 29 जून 2026

2. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरभेटी:- 30 जून 2026 ते 29 जुलै 2026

3. मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण:- 29 जुलै 2026 पर्यंत

4. प्रारूप मतदार यादीची प्रसिध्दी:- 05 ऑगस्ट 2026

5. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी:- 05 ऑगस्ट 2026 ते 04 सप्टेंबर 2026

6. दावे व हरकर्ती निकाली काढण्याचा कालावधी:- 05 ऑगस्ट 2026 ते 03 ऑक्टोबर 2026

7. अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी:- 07 ऑक्टोबर 2026


या मोहिमेदरम्यान पात्र मतदारांची नवी नोंदणी, दुबार नावांची तपासणी, स्थलांतरित मतदारांच्या नोंदी अद्ययावत करणे आणि मृत व्यक्तींची नावे वगळण्याची महत्त्वाची कार्यवाही केली जाणार आहे. या प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींना (BLA) देखील सहभागी करून घेतले जाणार आहे. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या मताचा हक्क सुनिश्चित करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.