नागपूर:- विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नगरसेवकांना लाखो रुपयांची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू असून काही ठिकाणी 5 ते 15 लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याच्या चर्चा आहेत. या पैशांचा स्रोत काय? पैसे देणारे आणि घेणारे कोण? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ते नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
विधान परिषद निवडणूक ही लोकशाही प्रक्रिया न राहता पैशांचा बाजार बनली आहे. 70 टक्के लोक विकले गेले. काँग्रेसच्या काही नेत्यांनी नगरसेवकांना पैसे दिल्याच्या चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, वर्धा-चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षातील काही नेत्यांवर आरोप केले असतील, तर त्यांनी त्यासंबंधीचे पुरावे पक्षश्रेष्ठींकडे सादर करावेत.


