चंद्रपूर:- वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड म्हणजेच WCL अंतर्गत काम करणाऱ्या एका कंत्राटी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त कुटुंबीय आणि कामगारांनी थेट WCL सब एरिया कार्यालयासमोर मृतदेह ठेवून तीव्र आंदोलन सुरू केले होते. शेवटी प्रशासनाने नमते घेत आर्थिक मदत आणि नोकरीचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
रामपूर येथील रहिवासी असलेले ४५ वर्षीय प्रकाश मोहरे हे WCL मध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. ७ जून रोजी कर्तव्यावर असताना इलेक्ट्रिक पोलवरून खाली पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात गेल्या १३ दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकाश मोहरे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे कुटुंबीय आणि इतर कामगार आक्रमक झाले.
संतप्त आंदोलकांनी थेट WCL सब एरिया कार्यालयाबाहेर मृतदेह ठेवून ठिय्या मांडला. मृतकाच्या कुटुंबाला तात्काळ मोठी आर्थिक मदत आणि वारसाला नोकरी मिळावी, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. आंदोलनामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून WCL प्रशासन आणि संबंधित कंत्राटी कंपनीने आंदोलकांसोबत चर्चा केली.
या यशस्वी चर्चेअंती मृत प्रकाश मोहरे यांच्या कुटुंबीयांना एकूण ३५ लाख ४३ हजार रुपयांची आर्थिक मदत आणि त्यांच्या मुलाला कंत्राटी कामगार म्हणून नोकरी देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. प्रशासनाने मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले असून, बल्लारपूर परिसरातील तणाव आता पूर्णपणे निवळला आहे.

