सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे एका भरधाव ई-रिक्षाने घरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरगाव येथील रहिवासी महेश गहाणे हे रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते. त्यांच्या नकळत त्यांची अडीच वर्षांची मुलगी श्रीजा ही देखील त्यांच्या मागे घराबाहेर आली आणि खेळू लागली.
त्याच वेळी एक्सपर्ट साबण कंपनीचा माल घेऊन जाणारी एक ई-रिक्षा गावात आली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या भरधाव ई-रिक्षाने थेट खेळत असलेल्या चिमुकलीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, श्रीजा गंभीर जखमी झाली.
अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने श्रीजाला नवरगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने तिला तातडीने नागभीड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, तिथे उपचारादरम्यान या अडीच वर्षीय चिमुकलीने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. याप्रकरणी ई-रिक्षा चालक प्रेमा नारायण चहांदे (रा. लाडबोरी) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करत आहेत.

