५३ आत्मसमर्पित माओवाद्यांना 'महाराष्ट्र दर्शन' सहल!
गडचिरोली:- अनेक वर्षे घनदाट जंगलात, हातात शस्त्रे घेऊन भटकणाऱ्या आणि हिंसेचा मार्ग निवडलेल्या ५३ आत्मसमर्पित माओवाद्यांना आता विकासाची नवी पहाट पाहायला मिळाली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने १२ जुलै ते १६ जुलै दरम्यान या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी एका विशेष 'महाराष्ट्र दर्शन' सहलीचे आयोजन करण्यात आले होते. जंगलाच्या बाहेरचे जग आणि आधुनिक महाराष्ट्र कसा आहे, हे या सदस्यांना जवळून अनुभवता आले.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत राबवण्यात आलेल्या या उपक्रमात ५३ आत्मसमर्पित माओवाद्यांनी सहभाग घेतला होता. १२ ते १६ जुलै या पाच दिवसांच्या प्रवासात या सदस्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख शहरे, रेल्वे, प्रगत शेती तंत्रज्ञान आणि मोठे उद्योग धंदे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. यात हल्दीराम उद्योगसमूह, दीक्षाभूमी, शेगावचे गजानन महाराज मंदिर, अजिंठा-वेरूळ लेणी, लोणार सरोवर आणि ऐतिहासिक दौलताबाद किल्ला अशा विविध ठिकाणांना त्यांनी भेट दिली.
अनेक वर्षांपासून समाजापासून आणि शहरांपासून दूर राहिलेल्या या नागरिकांसाठी हा अनुभव पूर्णपणे भावूक आणि थक्क करणारा होता. मोठ्या शहरांमधील गगनचुंबी इमारती, धावत्या लोकल गाड्या आणि महामार्ग पाहून अनेक सदस्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
या सहलीदरम्यान केवळ पर्यटनच नाही, तर या आत्मसमर्पित माओवाद्यांना रोजगाराच्या आणि शेतीच्या नव्या संधींची माहितीही देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून, ही सहल त्याचाच एक भाग आहे. पोलिसांच्या या आपुलकीच्या आणि संवेदनशील प्रयत्नांमुळे आता या ५३ नागरिकांचे भावविश्व पूर्णपणे बदलले असून, ते समाजात सन्मानाने जगण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हिंसेचा मार्ग सोडून शांतता आणि प्रगतीचा रस्ता निवडणाऱ्या या प्रवाशांना आणि गडचिरोली पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाला आमचाही सलाम.

