Chandrapur News: चंद्रपुरात तीव्र लक्षवेधी आंदोलन

Bhairav Diwase
सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा
चंद्रपूर:- नीट (NEET) आणि टीईटी (TET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज चंद्रपुरात विद्यार्थी आणि विविध संघटना रस्त्यावर उतरल्या. विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांना घेऊन आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक तीव्र लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

नीट आणि टीईटी परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ आज चंद्रपूर शहर घोषणांनी दणाणून गेलं. विद्यार्थी, आंबेडकरी, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. 'विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा', 'पेपरफुटीची चौकशी झालीच पाहिजे' 'केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्या' अशा घोषणा देत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर परिसर दणाणून सोडला.


या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी नीट व टीईटी परीक्षेतील गैरव्यवहाराची स्वतंत्र आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने चौकशी करण्याची आग्रही मागणी केली आहे. तसेच, देशातील शिक्षण व्यवस्थेच्या या ढिसाळ कारभाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील आंदोलकांनी लावून धरली.


या मोर्चामध्ये केवळ स्थानिक प्रश्नांवरच नाही, तर दिल्लीत विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनालाही चंद्रपुरातून जाहीर पाठिंबा देण्यात आला. आंदोलनाच्या शेवटी, विविध मागण्यांचे एक सविस्तर निवेदन प्रशासनामार्फत सरकारला सादर करण्यात आले. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे.