आई-मुलाला १.१६ किलो गांजासह रामनगर पोलिसांकडून अटक
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील शांतीनगर, बंगाली कॅम्प परिसरात घरातील देवघराच्या शेजारी अवैधरित्या गांजा बाळगून विक्री करणाऱ्या आई आणि तिच्या मुलावर रामनगर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या धाडीत पोलिसांनी १.१६० किलो निव्वळ गांजा जप्त केला असून, १२,२०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दि. २९ जुलै रोजी रामनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना, शांतीनगर बंगाली कॅम्प येथील रहिवासी माला मनोरंजन डे (वय ५५) ही तिचा मुलगा मानव मनोरंजन डे (वय २२) याच्या मदतीने स्वतःच्या घरातून अवैध गांजा विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात NDPS कायद्यांतर्गत आवश्यक परवानगी घेऊन पोलिसांच्या पथकाने पंचांसमक्ष संशयित आरोपींच्या घरावर छापा टाकला.
देवघराशेजारी आढळली गांजाची बोरी:
पोलिसांनी घराची पाहणी केली असता, देवघराच्या शेजारी एक प्लास्टिकची बोरी संशयास्पद स्थितीत आढळून आली. पंचांसमक्ष बोरीची तपासणी केली असता त्यातून गांजाचा उग्र वास येत असल्याचे स्पष्ट झाले. बोरीमध्ये गांजासदृश वनस्पतीची हिरवी पाने, फुले, बिया व देठ असा अंमली पदार्थ आढळून आला.
इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर मोजणी केली असता १.१६० किलोग्राम गांजा जप्त करण्यात आला, ज्याची बाजारभावानुसार किंमत रु. १२,२००/- आहे.
आरोपी आई व मुलाकडे विचारपूस केली असता, त्यांनी सदर गांजा विक्रीच्या उद्देशानेच आणल्याची कबुली दिली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्र. ९५७/२६, कलम ८(क), २०(ब), आणि २९ NDPS ॲक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक:
ही यशस्वी कारवाई सपोनि शिवाजी नागवे, सपोनि हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे, पोहवा आनंद खरात, बाया नैताम, रवी डेंगळे, रामप्रसाद नैताम, प्रकाश बलकी, जितेंद्र आकरे, मपोहवा मनिषा मोरे, पोअं संदीप गेडाम, प्रकाश महावी, पंकज ठोंबरे, सुरेश कौरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके आणि मपोअं ब्युटी साखरे यांनी पार पाडली.

