Chandrapur News: चंद्रपुरात शेतकरी आक्रमक; लॉयड्स मेटल्सचे प्रदूषित पाणी थेट MPCB कार्यालयात ओतले

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात उसगावच्या शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कंपनीतून नाल्यात सोडल्या जाणाऱ्या रसायनांमुळे आणि प्रदूषित सांडपाण्यामुळे शेतजमीन तसेच उभी पिके उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी थेट प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय गाठून अनोखे आंदोलन छेडले.


घुग्घुस परिसरातील उसगावच्या शेतकऱ्यांची शेतजमीन लॉयड्स मेटल्सच्या रासायनिक पाण्यामुळे निकामी होत आहे. यासंदर्भात जाब विचारण्यासाठी शेतकरी प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) कार्यालयात पोहोचले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई करण्याचे आश्वासन न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकऱ्यांचा पारा चढला. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोबत कॅनमध्ये आणलेले तेच काळेकुट्ट आणि प्रदूषित पाणी थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ओतून प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला.


वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासन ढिम्म हलत नसल्याने शेतकऱ्यांनी आता आरपारच्या लढ्याची तयारी दर्शवली आहे. लॉयड्स मेटल्सवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि बाधित शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.