गडचिरोली:- आंघोळीला गेलेल्या तीन मुलांचा सती नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथे घडली. या घटनेमुळे कुरखेडा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
लक्ष्मण सुन्हेर दुधकंवर(६), कुणाल रमेश दुधकंवर(५) व मोहित हिवराज सराटे(११) अशी मृत मुलांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, खेडेगाव येथील चार मुले आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास गावाजवळच्या सती नदीवर आंघोळीसाठी गेले होते.
मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. चौथ्या मुलाने प्रसंगावधान राखून गावकरी आणि मच्छिमारांना माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार, पोलिस पथक आणि आपत्ती निवारण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले असून, त्यांचा पंचनामा करण्यात आला.

