Saoli News: तलावात बुडून ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Bhairav Diwase

सावली:- सावली तालुक्यातील बोरमाळा येथे गावातीलच तलावात बुडून धृप दिवाकर कारमेंगे या अवघ्या ९ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बोरमाळा परिसरासह संपूर्ण सावली तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पाथरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरमाळा येथे घडली.


९ वर्षांचा धृप कारमेंगे हा तलावाच्या परिसरात गेला असता, अचानक त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला.
धृप पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.


घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितेश डोर्लीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास ठाणेदार नितेश डोर्लीकर यांच्या नेतृत्वात पाथरी पोलीस करत आहेत.