Chandrapur News : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानादिवशी आठवडी बाजार बंद!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, जिल्ह्यातील 20 ठिकाणचे आठवडी बाजार बंद राहणार आहेत.


नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी, 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 58 मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान शांततेत, निर्भय आणि सुरळीत पार पडावे, तसेच मतदान केंद्रांच्या परिसरात गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.


त्यानुसार वरोरा, शेगाव बु., चिमूर, भिसी, शंकरपूर, नागभीड, ब्रह्मपुरी, गांगलवाडी, सिंदेवाही, नवरगाव, भद्रावती, चंद्रपूर, घुग्गुस, मूल, सावली, बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर, पोंभुर्णा आणि गोंडपिपरी येथील शुक्रवारी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत.


जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी यासंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या आदेशाची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.