गडचिरोली:- एकीकडे गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील सिटी’ बनवण्याचे स्वप्न दाखवले जात आहे, तर दुसरीकडे याच जिल्ह्यातील दुर्गम भागात रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. एटापल्ली तालुक्यातील रेखनार गावातील २१ वर्षीय पार्वती झोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वी प्रसूतीनंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांच्या नवजात बाळाचाही मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील चोखेवाडा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या रेखनार गावातील ही दुर्दैवी घटना आहे. रेखनार ते चोखेवाडा हे सुमारे १५ किलोमीटरचे अंतर असून, गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
२९ सप्टेंबर रोजी प्रसववेदना सुरू झाल्यानंतर पार्वती झोरे यांना गडचिरोली येथील महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना त्याच दिवशी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. ३० सप्टेंबर रोजी त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, बाळाचे वजन कमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तीन दिवस उपचार सुरू असतानाच नवजात बाळाचा मृत्यू झाला.
यानंतर पार्वती यांचीही प्रकृती खालावत गेली. विविध रुग्णालयांत उपचार करण्यात आले; मात्र आर्थिक अडचणी, दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था आणि वेळेवर उपचार मिळण्यात आलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर २५ ऑक्टोबर रोजी पार्वती यांचीही प्राणज्योत मालवली.
एका आईचा आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. एकीकडे औद्योगिक विकासाची स्वप्ने दाखवली जात असताना दुसरीकडे दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत रस्ते, सक्षम आरोग्य सेवा आणि वेळेवर रुग्णवाहिका सुविधा मिळणार कधी, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेची दखल घेऊन प्रशासनाने दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

