गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता संपूष्टात आला असून, जिल्ह्यातील नागरीक आता माओवादाच्या दहशतीतून मुक्त झाले आहेत. भुतकाळात सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांकडून विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर केला जात असे. आंतरराज्यीय सिमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवाद्यांकडून हेे साहित्य तयार करण्यात येऊन गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये लपवून ठेवले जात असे. त्याचा वापर विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करुन आणण्यास केला जात होता. या विरोधात आज दिनांक 27 ऑक्टोंबर 2026 रोजी प्रभावी कारवाई करत माओवाद्यांनी जंगलामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलातील जवानांना यश आले आहे.
माओवाद्यांनी पोस्टे वांगेतुरी हद्दीतील मौजा माचुवंचा जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाली होती. मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे दिनांक 27 ऑक्टोंबर 2026 रोजी पहाटे पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली येथील 04 तुकड्या, बिडीडीएसचे 01 पथक शोध अभियान राबविणे कामी रवाना करण्यात आले होते. सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथकांकडून शोध अभियान राबवून बिडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता सदर ठिकाणावरुन 1) 12 नग क्लेमोर 2) 01 नग 12 बोअर रायफल 3) 03 नग सिंगल शॉट रायफल 4) 01 नग एअर गन 5) 01 नग बॉटल क्ष्कक़् स्फोटक 6) 01 नग जिवंत क्लेमोर स्फोटक 7) 01 सेट वायरलेस माईक सेट 8) 01 नग हत्याराचा लोअर हँडगार्ड 9) 100 नग सुतळी बॉम्ब 10) 05 जोड्या माओवादी गणवेशाचे हिरव्या रंगाचे कापड व इ. माओवादी साहित्य सि-60 व बिडीडीएस पथकांव्दारे घटनास्थळावरुन हस्तगत करण्यात आले असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माओवादी साहित्य घटनास्थळावर नष्ट करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बि. जे., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) सुनिल उईके यांच्या देखरेखी खाली विशेष अभियान पथक, गडचिरोली व इंट सेल तसेच बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे.

